औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठाला ऑफिशियल ई मेल आयडीवर बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा ई मेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली आहे. आज दुपारी १२ वाजता हा धमकीचा ई मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ई मेल मिळताच पोलस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, तत्काळ सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
चौकशीत हा धमकीचा ई मेल चेन्नई येथून पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात हा ई मेल नेमकं कुणी पाठवला? तसेच का पाठवला? याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे यांनी हायकोर्टात येऊन पाहणी केली.
बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या चार पथकांसह एटीएसचे पथकही खंडपीठात दाखल झाले असून, संपूर्ण परिसराची तपासणी सुरू आहे.या धमकीनंतरही खंडपीठाचे कामकाज नियमित सुरू आहे. ज्यांना न्यायालयात हजर राहायचे आहे, त्यांना मुभा दिलेली आहे. कोणताही गोंधळ उडाला नसल्याचे चित्र आहे. मात्र सुरक्षेस्तव कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.







