करोडो रुपयाचे आमिष दाखवून व्यवसायिकाची फसवणूक

फसवणूक
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शेअर ट्रेडिंगबरोबरच आयपीएल सट्टा तसेच रेसकोर्सचा व्यवसाय असून, त्यात करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे आमिष दाखवून महिलांनी एका व्यावसायिकासह दोघांना १५ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान याप्रकरणी मंगळवार पेठेतील ३६ वर्षीय व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पल्लवी गोसावी (वय 32), त्यांची आई किरण गोसावी (वय 53, दोघी रा. शिव क्लासिक सोसायटी, मंगळवार पेठ), त्यांच्या कामातील पार्टनर अर्शद शेख (वय 38, रा. केडगांव, ता. दौंड) आणि प्रसाद विश्वनाथ कांबळे (वय 39, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 नोव्हेंबर 2023 ते 12 मे 2024 दरम्यान नरपतगिरी चौकातील कार्यालयात घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्क्रॅम्प व्हेंडर म्हणून व्यवसाय करतात. व्यवसासानिमित्ताने त्यांची पल्लवी गोसावी व तिची आई किरण गोसावी यांच्याशी ओळख झाली. पल्लवी गोसावी फायनान्स कन्सल्टंट आहेत. त्यांनी तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंगबरोबरच आयपीएल सट्टा, रेसकोर्सचा व्यवसाय असून त्यामध्ये करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे प्रलोभन दाखविले. सुरुवातीला या दोघींनी तक्रारदार यांना २४ नोव्हेंबर २०२३ रोजी २ लाख रुपये गुंतवणूक करायला सांगितली. डिसेंबर २०२४ पर्यंत या गुंतवणुकीवर ३२ लाख रुपये एवढा नफा मिळवून देऊ अशी खोटी आश्वासने, खोट्या भूलथापा व आमिषे दाखवली. त्याला बळी पडून तक्रारदार यांनी नोव्हेबर २०२३ मध्ये ६ लाख रुपये गुंतवणुक केली. २०२४ मध्ये पल्लवी गोसावी हिने त्यांच्याकडून एकूण १९ लाख ८० हजार रुपये घेतले. त्या बदल्यात कोणत्याही व्यवसायाची मेंबरशीप अथवा मोबादला दिला नाही. त्यांनी वारंवार विचारणा केल्यावर त्यांना १२ लाखांचा धनादेश दिला. तो १२ मे २०२४ तारखेचा होता.

हा चेक आठ दिवसांनंतर बँकेत भरा असे सांगितले. पल्लवी गोसावी हिने ६ लाख रुपये परत केले. आठ दिवसांनी चेक भरण्यासाठी ते बँकेत जाणार होते. त्यावेळी पल्लवी हिचा फोन आला. हा चेक आताच भरु नका, तो चेक ऑगस्टमध्ये भरा. त्यावेळेस चेकची रक्कम अधिक ४० लाख रोख देते, असे आश्वासन दिले. ऑगस्ट २०२४ मध्ये ते पल्लवी गोसावी यांना भेटण्यास गेल्यावर त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्यांनी ऑगस्टमध्ये चेक बँकेत भरला. तो चेक न वटता परत आला. त्यानंतर ते पल्लवी हिला भेटण्यास गेले असता तिने त्यांना हकलवून लावले. त्यांच्या कामातील पार्टनर अर्शद शेख याने काम प्रोसेसमध्ये आहे, तुमचे पैसे मिळतील, असे सांगितले. प्रसार कांबळे याने वेळोवेळी फिर्यादींची समक्ष भेटून तो स्वत: पैसे परत देण्यास जबाबदार असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्याबरोबरच मंगळवार पेठेतील एका महिलेची २ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण १५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here