शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक- शिक्षक – डॉक्टर यांच्या समवेत पालक मेळावा संपन्न झाला.
उन्हाळी सुट्टी निमित्त साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. श्री नचिकेत वर्पे (राजमाता जिजाऊ मेडिकल फाउंडेशन शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर ) व डॉ. श्री रामनाथ गुंजाळ (सिद्धिविनायक क्लिनिक धांदरफळ खुर्द) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. साईबाबा शाल गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून श्री सुनील सानप व श्री वसंत ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.नचिकेत वर्पे यांनी विद्यार्थ्यांच्या आहारा विषयी व तब्येतीची काळजी घेण्याविषयी माहिती दिली. तसेच डॉ. रामनाथ गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना वर्षभरात होणाऱ्या आजाराविषयी व त्यावर घेण्यात येणाऱ्या उपचार यावर माहिती दिली. तसेच पालक प्रतिनिधी श्री वसंत ठोंबरे यांनी आपल्या पाल्याला येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करावयाच्या सहकार्याबद्दल माहिती दिली. तसेच पालकांना आपल्या पाल्याबद्दल काही अडचणी असतील तर त्याविषयी माहिती विचारण्यात आली व त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यात आले. विद्यालयाचे विशेष शिक्षक श्री नासिर देशमुख सर यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कागदपत्राविषयी माहिती दिली. विद्यालयाच्या मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या पालकत्व व वर्तनसमस्या विषयी माहिती सांगितली.
हा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विद्यार्थ्यांचे रिपोर्ट कार्ड देण्यात आले व विद्यार्थी व पालकांना भोजन व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका श्रीमती स्वाती शेळके मॅडम यांनी केले. हा सर्व कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.







