योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचे नवे अधीक्षक

कोल्हापूर

कोल्हापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर जावेद देवडी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे येथे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नांदेड येथे नागरी संरक्षण हक्क विभागात कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरच्या नव्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

महेंद्र पंडित यांनी मे 2023 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. विशेषतः अवैध धंद्यांवर कारवाई, गुन्ह्यांची तात्काळ उकल, तसेच निवडणुका, मोर्चे आणि आंदोलनांच्या वेळेस प्रगल्भ व्यवस्थापन करून त्यांनी आपली खास छाप सोडली.
पंडित यांच्या कार्यशैलीमुळे कोल्हापूरमध्ये शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण प्रस्थापित राहिले. त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक नागरिकांनी आणि स्थानिक संघटनांनी त्यांचे आभार व्यक्त केले असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या अनुभवामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here