सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांना नवीन खाकी गणवेश मिळण्यात प्रचंड विलंब; सुरक्षा मंडळ व्यवस्थापन समितीवर नाराजीचा सूर

सुरक्षा मंडळ व्यवस्थापन

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंडे) : जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना देण्यात येणाऱ्या नवीन खाकी गणवेशाच्या वितरणात मोठा विलंब होत असल्याने सुरक्षारक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने अधिकृत गणवेश म्हणून खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता दिल्यानंतर, सुरक्षारक्षकांमध्ये नव्या गणवेशाबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पुणे जिल्ह्यातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना हा गणवेश प्राप्त झालेला नाही.

या विलंबामुळे अनेक सुरक्षारक्षक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले असून, त्यांनी मंडळाच्या व्यवस्थापन समितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “गणवेश हा केवळ कपड्याचा संच नसून, तो आमच्या कामाच्या ओळखीचा, शिस्तीचा आणि आत्मसन्मानाचा भाग आहे. जेव्हा तो वेळेवर मिळत नाही, तेव्हा आम्हाला अपमानास्पद वाटते,” असे मत काही सुरक्षारक्षकांनी मांडले.
मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणवेश तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच जिल्ह्यातील सर्व सुरक्षारक्षकांना जुन २०२५ या महिन्यात गणवेश मिळून जातील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात काही जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गणवेश न मिळाल्याच्या तक्रारी आहेत.

विशेष म्हणजे, सुरक्षारक्षक हे शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करतात. अशा ठिकाणी त्यांचा अधिकृत गणवेशात वावर हा गरजेचा असून, त्यातून संस्थेची विश्वासार्हता आणि सुरक्षा व्यवस्थेची गंभीरता अधोरेखित होते. सुरक्षा रक्षक संघटनांनीही या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज असून, शासनाने आणि मंडळाच्या व्यवस्थापनाने तत्काळ पावले उचलून गणवेश वितरण प्रक्रियेचा वेग वाढवावा, अशी मागणी सध्या केली जात आहे. अन्यथा, सुरक्षारक्षकांमध्ये वाढत चाललेली नाराजी आंदोलनाच्या स्वरूपात व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदुर संघाचे जिल्हा सचिव तुकाराम कुंभार,जिल्हा अध्यक्ष युवराज नाळे महिला उपाध्यक्ष कानोपाञा ढोले ,प्रदेश संघटनमंत्री अविनाश मुंढे, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारधी प्रदेश महीला उपाध्यक्ष नंदा धोञे संघटन मंञी मिना आढारी महीला प्रमुख मंजना आढारी ,समीर अढारी,शरद कदम, यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here