
अवसायक राजेंद्र देशमुख यांनी केली पाहणी
नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य धोक्यात आले असून, सुरक्षा यंत्रणेसह स्थानिक कामगारांची उपासमार सुरू आहे. असे असतांना कारखान्याच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला जागोजागी भगदाड पडत आहेत.
गेल्या दोन तीन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे वसाकाच्या दक्षिण बाजूला असलेली उंच संरक्षक भिंत जागोजागी पडत असल्याने एका सर्वेनंबरमध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतीना जागोजागी भगदाड पडत आहेत. यामुळे कोट्यवधीची मालमत्ता धोक्यात आली आहे. ठराविक अंतराने एकाच सर्वेनंबरमध्ये भिंत कोलमडून पडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून, खाली काळ्या मातीची जमीन आहे. त्यामुळे ही भिंत खचत असल्याचे प्रथम दर्शनी ऐकायला मिळत आहे. मात्र भिंतींना जागोजागी तडे न जाता भगदाडं पडत असल्याने, त्या भागात उंदीर व घुशींचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील पंधरवड्यात पडलेले खिंडार जेसीबी मशिनने काटे लावुन बंद करण्यात आले होते मात्र आता परत अंदाजे ३० ते ४० फुट लांब भिंत पडली (?) असल्याने सुरक्षा यंत्रणा धास्तावली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांना वेळवर वेतन उपलब्ध करून देण्यात आले तर ते व्यवस्थित लक्ष देतील, असे वसाका मजदुर युनियन चे कार्याध्यक्ष कुबेर जाधव तसेच युनियन अध्यक्ष अशोक देवरे यांनी अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. या हंगामात कुठल्याही परिस्थितीत वसाका सुरू करणे गरजेचं आहे अशी गळ वसाकाच्या युनियन पदाधिकाऱ्यांनी अवसायक राजेंद्र देशमुख यांना घातल्याचे समजते. आज दुपारी वसाकाला ज्यांनी जमिनी दिल्या अशा जमीनधारक कामगारांनीही अवसायक राजेंद्र देशमुख यांची भेट घेऊन वेतन व वसाका सुरू करणेसाठी निवेदन दिले. या सर्व घडामोडी बघता वसाका सुरू करणे संदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिखर बॅंकेकडून कर्ज पुरवठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने नजिकच्या काळात लवकरच कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे.







