जळगाव (संपादक सुनिल पाटील) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या तेजस गजानन महाजन (वय १३) या शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासोबत रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती व्यवसायासोबत कृषी केंद्राचे दुकान चालवतात. सोमवारी, १६ जून रोजी गजानन महाजन हे काही कामासाठी जळगावला गेले होते. याच दिवशी गावात आठवडी बाजारही होता. तेजस दुकान बंद करून घरी येईल असे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. अखेर रात्री उशिरा एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी १७ जून रोजी सकाळच्या सुमारास रिंगणगाव शिवारातील खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एक बालकाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मृतदेहाची ओळख तेजस महाजन म्हणून पटली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.







