तीन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या मोस्ट वॉन्टेड नक्षल नेत्याचा खात्मा

नक्षल नेत्याचा खात्मा

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : सहा राज्यात मोस्ट वांटेड असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात आंध्रप्रदेश पोलिसांना यश आले आहे. तसेच या चकमकीत चलपतीच्या पत्नीला देखील कंठस्नान देण्यात आले आहे. नक्षल नेत्याला पकडून देणाऱ्याला सहा राज्यांमधूल तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्लीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यावरून १८ जूनला विशेष नक्षलविरोधी पथक ग्रेहाउंड्सच्या जवानांनी या परिसरात शोधमोहीम राबवली होती. दरम्यान, पहाटे सहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसाच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनी देखील प्रतिहल्ला करत गोळीबार करण्यास सुरवात केली.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात केंद्रीय समिती सदस्य गजर्ला रवि उर्फ उदय हा ठार झाला आहे. तसेच चकमकीत रविसह नक्षल नेता चलपती याची पत्नी रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि प्लाटून सदस्य अंजु या दोघींचाही खात्मा करण्यात आला आहे. मारडपल्ली जंगलात ही चकमक झाली. दरम्यान गजर्ला रवी ऊर्फ उदय हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याचा खात्मा झाल्याने नक्षलवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे.
मूळचा तेलंगणातील रहिवासी असलेल्या रवी याच्यावर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.त्याच्यासोबत अरुणालाही जवानांनी ठार केले. ती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य चलपती याची पत्नी होती. तसेच, ती वरिष्ठ नक्षलवादी नेता चेरकुरी राजकुमार ऊर्फ आझादची बहीण होती. तिच्यावरही ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here