बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : जिल्ह्यातील नांदुरा शहरातील राखोंडे पुरा भागात असलेल्या विद्युत वितरण केंद्रातील (डीपी) शनिवारी संद्याकाळी अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठा अपघात टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEB) च्या निष्क्रियतेचा आणि बेपर्वाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, नांदुरा शहरात गेल्या काही वर्षांत MSEBच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात झाले असून, काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही कंपनीकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे आरोप होत आहेत.
मात्र, विद्युत डीपीमध्ये अनेक दिवसांपासून तांत्रिक बिघाड असूनही MSEBने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. “हे दुर्लक्ष अजिबात माफ करण्यासारखे नाही,” असे म्हणत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना नांदुरा शहरासाठी एक इशारा असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे अनेकांनी म्हटले आहे. संपूर्ण जनतेचे लक्ष आता MSEBच्या कारभाराकडे वेधले गेले आहे.







