पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

accident
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : आज (दि.१८) देहूमधून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. दरम्यान आज वारीची सुरुवात होत असतानाच देहू-आळंदी रस्त्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगातील क्रेनने धडक दिल्यामुळे एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.

नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. ते देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइल वरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालक याला ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here