ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : शिक्षक पेशाला काळिमा फासणारी घटना भाईंदरमध्ये घडली असून, खासगी ट्युशन घेणाऱ्या ५० वर्षीय शिक्षकानेच आपल्या अल्पवयीन १७ वर्षीय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेची पालकांना समजताज त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपीला अटक केली असून, पुढील तपाल सुरू आहे.
भाईंदर येथील प्रसिद्ध क्लासेसचा शिक्षक लकी राय उर्फ पुणेनद्रु योगेंद्रनाथ राय (वय ५०)याने एफ.वाय.बीएमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर लैगिक अत्याचार केला आहे. २०२३ साली तरूणीची या शिक्षकाची भेट झाली. त्यानंतर २०२४ साली तिने त्याच्या खासगी ट्युशनमध्ये प्रवेश घेतला. त्याने आधी तरूणीचं विश्वास संपादन केला. करिअरमध्ये यश मिळवून देईन असं सांगत त्याने विश्वास दिला. त्यानंतर त्याने तरूणीसोबत जवळीक साधली.नंतर तिचे लैंगिक शोषण केले.
आई वडिलांना जीवे ठार मारेन, असं धमकी देत तो तरूणीसोबत अत्याचार करीत राहिला. या भीतीपोटी तरूणी देखील गप्पपणे सगळं सहन करीत राहिली. अखेर धमक्यांना कंटाळून पीडितेने आपल्या आई वडिलांना यासंदर्भात माहिती दिली. कुटुंबाला याची माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नवघर पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी तपास करून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.







