सोलापुरात गाडीचा हॉर्न जोरात वाजविल्याच्या कारणावरून तुफान दगडफेक, सातजण जखमी

दगडफेक

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : रात्रीच्या सुमारास वस्तीतील रस्त्यावरून जाताना साईड मागण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजविला. मात्र गाडीचे हॉर्न जोरात का वाजवला या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. यानंतर त्याचे पर्यावसन तुफान दगडफेकीत झाल्याची घटना सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे. सदर घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक आहे.

सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात हि घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घोंगडे वस्ती परिसरातील रहिवासी रऊफ इनामदार आणि त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत समोरच्यांना रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो? यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली.
किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर आधी भांडणात झाले. त्यानंतर दोन्ही गटाचे सुमारे तीनशे हुन अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आला. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत माजी नगरसेवक बिपीन पाटील याच्यासह दोन्ही गटातील ७ जण जखमी झाले आहेत.
यावेळी परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा जखमीना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here