सांगली (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : राज्यातील मेडीकल प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा असलेल्या नीट चा नुकताच निकाल लागला आहे. नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून, शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलाने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी बेदम होती की यात या मुलीला जीव गमवावा लागला. ही घटना जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या वडीलांना अटक करण्यात आली आहे.
बारावीत शिकणाऱ्या साधना धोंडीराम भोसले हिला नीट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तिच्या वडिलांनी लाकडी खुंट्याने मारहाण केली. या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याद्यापक म्हणून साधनाचे वडील कार्यरत आहेत. नीट परिक्षेत साधनाला कमी गुण मिळले. हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले होते. त्यातून हा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबती साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
मारहाणीनंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी सकाळी ते योगा दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी आल्यानंतर साधनाच्या वडिलांना ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. साधना हुशार होती. तिला दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळाले होते. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु डॉक्टर बनण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याने, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







