जळगाव (संपादक सुनिल पाटील) : अजिंठा फिल्म सोसायटी द्वारा ५ व्या टुरींग टाॅकिज मध्ये चित्रपट आस्वाद आणि चर्चा उत्साहात संपन्न झाली. अजिंठा फिल्म सोसायटी – देवगिरी चित्र साधना द्वारा प्रत्येक महिन्याच्या ४ थ्या रविवारी भाऊंचे उद्यान येथे टुरींग टॉकिज उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या महिन्यात ५व्या भागात खास आषाढी वारीच्या निमित्ताने संत सावता माळी यांच्या विठ्ठल भक्तीने भारलेला, अत्यंत गाजलेला ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधील सर्वोत्कृष्ट बाल लघुपट ‘शाळा सुटली’ चे विशेष स्क्रिनींग यावेळी करण्यात आले.
उसतोड कामगारांची मुले शिक्षणापासून कशी वंचित राहतात यावर भाष्य करणारा शाळा सुटली हा लघुपट अनेकांना अंतर्मुख करुन गेला. यानंतर मराठी चित्रपटांच्या वैभवशाली काळाची साक्ष देणारा ‘भक्ती चा मळा’ या चित्रपटाचा रसिकांनी आस्वाद घेतला. संत सावता माळी यांच्या उत्कट विठ्ठल भक्ती चा आविष्कार पाहतांना अनेकांचे डोळे पाणावले होते.
यावेळी झालेल्या चर्चेत अनेक श्रोत्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार प्रकट केले.डॉ.राहून मयूर व सीए पल्लवी मयूर यांनी या उपक्रयाचे प्रायोजकत्व स्विकारले.अजिंठा फिल्म सोसायटी व चित्र साधनेचे पदाधिकारी तसेच चित्रपट रसिक या वेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.







