नवी दिल्ली – 2018 मध्ये चांगली कामगिरी करणारी देशातील आघाडीची धावपटू हिमा दासची शिफारस आसाम सरकारने प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी क्रीडा मंत्रालयाला पाच जूनला पत्र पाठवले.
हिमा शिवाय भालाफेक खेळाडु नीरज चोपडा, पैलवान विनेश फोगाट, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा, महिला हॉकी कर्णधार रानी रामपाल आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची शिफारस देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 20 वर्षीय हिमाने 2018 मध्ये 20 वर्षाखालील जेतेपद मिळवण्यासोबत जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटरमध्ये रौप्यपदक, 400 मीटर रिले आणि महिला 400 मीटर सुवर्णपदक मिळवले आहे. तिला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता.
हिमा ही आसामच्या ढिंग गावची असून यावर्षी राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली सर्वात युवा खेळाडू आहे. हिमाने फिनलँड येथे 2018 साली झालेल्या 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळवले होते आणि असे करणारी ती जगातील पहिली एथलीट ठरली.






