सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक अडचणीत असली तरी त्यावर मात करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने घेतलेला निर्णय बाजार समितीला तारणहार ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज फळे, भाजीपाला मार्केट मध्ये मार्केट गाळ्यांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असा ठाम विश्वास सभापती दत्तात्रय पवार यांनी व्यक्त केला.
वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपसभापती विजयकुमार शिंदे, सहायक निबंधक दाजी खताळ, बाळासाहेब भोसले, संचालक गिरीश शहा, संकेत म्हामणे, सुनील फडतरे, लता जगदाळे, अभिजित देशमुख, महेश घार्गे, सचिव दतात्रय नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपसभापती विजयकुमार शिंदे म्हणाले, खटाव तालुक्यातील तसेच परिसरातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य हमीभाव मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. शनिवार दि. ५ रोजी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज फळे, भाजीपाला मार्केटचे लोकार्पण होणार असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विविध मान्यवर, संचालक व बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सचिव दत्तात्रय नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका लता जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी व्यापारी, शेतकरी व बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







