शिर्डीतील गणेशवाडी मुख्य रस्ता १२ मीटर करावा : मनसेचे कोते यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

शिर्डी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी येथील गणेशवाडी परिसरातील मुख्य रस्ता हा १२ मीटर करावा यासाठी मनसेचे दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी सतिष दिघे यांना महिलांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

यावेळी दत्तात्रय कोते म्हणाले, माझ्या प्रभागातील पानमळा ते रामनगरी नांदुर्खी शिवेपर्यंत सर्व रस्त्याचे काम करण्यात आले, परंतु सर्वात मोठा रहिवासी भाग असलेला एकूण १४ गल्ल्या असणारा गणेशवाडी मुख्य रस्ता हा डि.पी. प्लॅननुसार १२ मीटर आहे. तो रोड भूसंपादन करून करावा, अशी मागणी वारंवार प्रत्येक नगरपंचायत मिटिंगमध्ये केली आहे. शिर्डी शहरातील सर्व विकासकामे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात चालू आहेत; मग आमच्या भागातील साधारणतः दीड दोन किलोमीटर रोड आपण निधी उपलब्ध करून करू शकता. आज रोजी फक्त १० ते १२ फुटांचा रोड आहे. महिलांना पायी चालताना समोरून एखादी ४ चाकी गाडी आली तर रोडच्या खाली उतरावे लागते. खूप मोठी दळणवळण या रोडवर आहे. त्या भागातील लोकांचे घरांचे काम चालू आहे. मोठे डंपर येतात, महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास या परिसरातील नागरिक आंदोलन करणार आहेत.
मुख्याधिकारी सतिष दिघे म्हणाले, या रोडलगत कोते, गोंदकर आणि अन्य लोकांची शेती आहे. त्यांनी सहमती दिली तर मी १५ दिवसात रस्ता तयार करुन देतो; परंतु शेतकरी त्यांच्या जमिनीचा मोबदला मागतात. आपण आता भूसंपादनाची प्रक्रिया करून वेळ जाईल. सद्यस्थितीत जो रोड आहे तो २० फुटांपर्यंत आपण करू, असे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here