जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास जुन्या नव्या अशा एकूण ७० कलावंताचं आज एकत्रीकरण झालं. अनेक वर्षा नंतर एकत्रित झालेल्या कलावंतांनी गळा भेट घेत अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला.
खान्देश नाट्य प्रतिष्ठानच्या स्थापने पासून ज्या ज्या कलावंतांचा या प्रतिष्ठानच्या कार्यास हातभार लागला त्या सर्व जेष्ठ रंगकर्मींचा यावेळी जेष्ठ रंगकर्मीं आणि नाट्य समिक्षक प्रा. राजेंद्र देशमुख तसेच जय भवानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भानुदास पाटील, सचिव बाळकृष्ण पाटील, सहसचिव रविराज पगार आणि श्री.महाजन यांच्या हस्ते उत्तमराव नेरकर, प्रमोद बाविस्कर, सुनंदाताई गवळी, अरुण सानप, रविंद्र साळी, सोमनाथ सानप, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, शाम जगताप, संजय निकुंभ, पियुष रावळ, सोनल कपोते, चंद्रकांत चौधरी, मिलिंद देशमुख, अरुण साळुंखे, ओमप्रकाश शर्मा, रवी पाटील या गुरूतुल्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारार्थी योगेश शुक्ल यांनी खान्देश नाट्य प्रतिष्ठानचा इतिहास आणि आठवणी जागवत. खानाप्रची वैशिष्ट्ये आणि तेथून तयार झालेल्या व आज मनोरंजन विश्व गाजवत असलेल्या कलावंतांची माहिती उपस्थितांना दिली. प्रमुख पाहुणे रविराज पगार यांनी जय भवानी शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या विद्यालयातून या देशातील शिक्षीत पिढी घडविण्याचे कार्य नाट्यवेड्या रंगकर्मींनी उभे केले, हे सांगत असताना एका विचाराचे पाच लोक जमले तर काय होऊ शकते. याचे उदाहरण दिले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी नाट्यवेडा माणूस साधारण असला तरी तोच असधारण कार्य करण्याचे धाडस दाखवु शकतो. कारण नाटक ही कला समृद्ध जीवन जगण्यासाठी समाज उजागर करणारे प्रभावी माध्यम आहे. असे सांगत सत्कारमुर्तींचे अभिनंदन केले.
यानंतर खान्देश नाट्य प्रतिष्ठानला येत्या २०२६ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त चिंतामण पाटील यांचा गौरव सोहळा दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यासंबंधी माहिती देत, शरद भालेराव यांनी सर्व रंगकर्मींना आवाहन केले आहे. यावेळी स्मरणिका खान्देश नाट्य प्रतिष्ठान तयार करणार आहे त्यासाठी आपले लेख आपण १ ऑगस्टपर्यंत योगेश शुक्ल यांच्याकडे पाठवावेत. यानंतर अरुण सानप यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, प्रदीप जाधव, कु.एकता आसोदेकर यांनी परिश्रम घेतले.







