भागीदाराचा विश्वासघात करुन ३० लाखांचा माल लंपास करणाऱ्या भागीदाराला अटक

विश्वासघात

नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : गंगापुर पोलीस ठाण्याच्या व खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत एका थरारक घडामोडीत व्यवसायिक भागीदाराने केलेल्या तब्बल ३० लाख रुपयांच्या कापडमालाच्या अपहाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी २७,२७,५३४ रुपये किमतीचा माल हस्तगत करून आरोपीला जेरबंद केले आहे.

जुन्या सायखेडा रोडवरील चित्तरंजन हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे महेश हरी उदावंत (३५) यांच्या तक्रारीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महेश उदावंत, त्यांचे भाऊ रोहित उदावंत आणि युसूफ अहमद शेख हे गंगापुर रोडवरील ‘बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ’ नावाच्या कापड दुकानाचे भागीदार होते. मात्र, विश्वासघाताची कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा युसूफ शेख यांनी १४ मे ते ९ जुलै २०२५ या कालावधीत विक्रीचा पैसा दुकानाच्या बँक खात्यात न जमा करता आपल्या वैयक्तिक खात्यात वळवला. एवढेच नव्हे तर त्यांनी आपला भाऊ आरिफ शेख आणि मुलगी आयेशा शेख यांच्या मदतीने दुकानातील ३० लाख रुपये किमतीचा सियाराम, रॅमड आदी नामांकित कंपन्यांचा शुटिंग-शर्टिंगचा, ब्लेझर, शेरवानी, जोधपुरीचा मालही लंपास केला.
गंगापुर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे युसूफ शेख आणि आरिफ शेख यांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी इगतपुरीत लपवून ठेवलेल्या २७,२७,५३४ रुपये किमतीच्या मालाची माहिती दिली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राउत, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. पुढील तपास पोउनि भटु पाटील आणि पोना गौरव खांडरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here