नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : अपघाती विम्याचे पैसे मिळवण्यासाठी एका भिकाऱ्याचा बळी घेऊन त्याचा खून अपघात असल्याचे भासवण्याचा थरारक कट पोलिसांनी उलगडला आहे. या कटात सामील असलेला आणि साडेतीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत असलेला मुख्य सूत्रधार योगेश साळवी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
२०२२ मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने नाशिक हादरून गेले होते. अशोक भालेराव नावाच्या व्यक्तीच्या नावाने अपघाती विमा उतरवून त्याच्यासारख्या दिसणाऱ्या एका भिकाऱ्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तेव्हापासून योगेश साळवीसह त्याचे साथीदार फरार होते.
अखेर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी योगेश साळवी लोणार गल्लीतील फनिबाबा दर्गाजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, साडेतीन वर्षे साळवीने पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक ठिकाणी आश्रय घेतला होता. तो नर्मदा परिक्रमा, प्रयागराजचा कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर येथे लपून राहिला होता. वेषांतर करून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.







