मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु असलेला वाद कायम आहे. लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधिमंडळात आज आव्हाड आणि पडळकर समर्थकांनी राडा घातला. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, मारहाण झाली. आता या प्रकरणाची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली आहे. विधिमंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडे अहवाल दिलेला आहे.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये कालच वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
विधान भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे.सर्वपक्षीय आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विधिमंडळात येतात. बऱ्याचदा आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे पासही नसतात. परवाना नसताना ते अनेक ठिकाणी फिरत असतात. विधिमंडळात त्यांचा अगदी मुक्त संचार असतो. आमदारांच्या कार्यकर्त्यांचं विधिमंडळात फोटोसेशन चालतं, अशा महत्त्वाच्या बाबी पोलिसांनी त्यांच्या अहवालात नमूद केल्या आहेत.







