क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना, क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळातर्फे शालेय साहित्यांचे वाटप

लहुजी शक्ती सेना

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ, लष्कर सोलापूर यांच्यावतीने सोलापूर महानगरपालिका कॅम्प प्रशाला येथे शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, प्रशालेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन,माजी अध्यक्ष विश्वेर गायकवाड , क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष अभिषेक हाटकर , शुभम पारधे, सुरज डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ऋत्विक जयकर यांनी सांगितले की, अण्णा भाऊ हे परिवर्तनवादी, युगप्रवर्तक क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते. त्यांच्याकडे प्रखर बुद्धिमत्ता, शरीराची चपळता, पाठांतराची जबरदस्त क्षमता, आवाजात धारदारपणा,विविध वाद्यात पारंगतता होती. त्यांनी ३५ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, १० पोवाडे, १३ लोकनाट्य, ३ महानाट्य आणि १ प्रवास वर्णन लिहले . त्यांच्या सात कादंबऱ्यावर आधारित मराठी चित्रपट निघाले. त्यांची चित्रा ही कादंबरी रशियामध्ये लोकप्रिय होती. अण्णाभाऊंनी रशिया भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून उलगडून सांगितला .अण्णा भाऊंच्या साहित्याचे विशेष म्हणजे ते माणसाच्या सुखदुःखाचा, जय पराजयाचा साथीदार होत असे .
अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर यांचे या चळवळीतील योगदान शाहिरी ,पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व चळवळीत लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्वपूर्ण आहे. मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी डफावर थाप मारून ‘माझी मैना गावाकडं राहिली.. माझ्या जिवाची होती या काहिली’ हे रूपक गीत अण्णा भाऊंनी रचले.जे आज सुद्धा अनेकांना वेड लावते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती साधावी. या शब्दात आपले मत व्यक्त केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here