जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : शहरातील एका महिला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करत अपहरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षाचालकाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरुवारी (१७ जुलै) शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालक सलमान अहमद निजाम (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थिनीला मोबाईल करण्यासह तिचा पाठलाग करत होता. तिने त्याला वारंवार नकार देत, आपले लग्न ठरल्याचेही सांगितले होते. मात्र तरीही सलमानने त्रास देणे थांबवले नव्हते. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता कॉलेज सुटल्यानंतर सलमानने विद्यार्थिनीला जबरदस्तीने आपल्या रिक्षात (क्रमांक एमएच १९ सीडब्ल्यू १६५२) बसवले आणि कोर्ट चौकमार्गे खान्देश सेंट्रल मॉलकडे नेले.
तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान परिसरातील काही तरुणांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रिक्षाचालकाला जाब विचारला. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि रिक्षाचालक सलमान अहमद याला ताब्यात घेतले. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपहरण व विनयभंग गुन्ह्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







