- खाजगी एजंट कडून केली जातेय नागरिकांची फसवणूक…..
- आरटीओचे अधिकारी आणि खाजगी एजंट यांची मिलीभगत…
- स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दुर्लक्ष
पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : मंगळवारच्या बाजारात पंढरपूर शहरांमध्ये अवैधरित्या वाहन खरेदी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली असून याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. कोणत्याही प्रकारचा आरटीओचा वाहन खरेदी विक्रीचा परवाना नसताना तसेच नोंदणीकृत परवाना असून देखील बेकायदेशीर खरेदी विक्री करून अनेक ग्रामीण भागातील लोकांची व शहरी भागातील लोकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे
याबाबत अनेकांनी तोंडी स्वरूपात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रारी देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.. पंढरपूर शहरामध्ये मोटार सायकल वाहनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे.. सध्या वाहनांच्या किमती वाढल्यामुळे जुने वाहने घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे अनेक जण मंगळवारच्या बाजारात वाहने घेण्याकरिता जात असल्याचे दिसून येत आहे.. मात्र मंगळवारच्या बाजारात खाजगी एजंटची संख्या वाढल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार व कोणत्याही प्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवहार करण्याची अक्कल नसलेले बेरोजगार या क्षेत्रात आल्यामुळे अनेकांची फसगत होत आहे.
एकाच वाहनांची दोन दोन व्यक्तीला विक्री करून अर्धवट व्यवहार केले जात आहे व पैसे देण्याघेण्यावरून वाद विवाद होणाच्या घटना देखील वाढलेले आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेले व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक खासगी एजंट यांना परिवहन विभागाच्या वतीने वाहन खरेदी विक्रीचा परवाना दिलेला असल्यामुळे असे लोक गावगुंडांप्रमाणे व्यवहार करत असून यातूनच वादविवाद होऊन तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे वाहन खरेदी विक्री करणाऱ्या दलालांची चारित्र्य पडताळणी होणे व कॅरेक्टर सर्टिफिकेट पडताळणी होणे गरजेचे आहे मात्र याकडे परिवाहन विभागाचे अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे प्रकटीचा शाखा कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना या खाजगी एजंट कडून दरमहा मलिदा तर दिला जात नाही ना…? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे..
वास्तविक पाहता राज्य शासनाने मोटार वाहन ड्रायव्हिंग लायसन काढणे, वाहन ट्रान्सफर करणे, याकरिता ऑनलाइन पद्धत सुरू केलेली आहे असे असताना देखील खाजगी एजंट लागतात तरी कशाला..? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे परिवाहन विभागाचे अधिकार्यांकडूनच खाजगी एजंट कडून आलेली प्रकरणे व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकरणी निकाली काढली जात नसून ते प्रलंबित ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे व अनेक परवाने कागदपत्रे त्रुटी असल्याचे सांगून सह्या केल्या जात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वाहन खरेदी विक्री करणारे खासगी एजंट व परिवहन विभागातील आरटीओचे अधिकारी, कर्मचारी, यांची मिलीभगत उघड झाली असल्याचे दिसून येत आहे … त्यामुळे पंढरीत सर्वसामान्य नागरिकांची वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मोठी फसवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.







