पिंपरी चिंचवडमध्ये किराणा व्यावसायिकाचे अपहरण करुन खंडणीची मागणी

अपहरण

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : किराणा व्यावसायिकाला माझ्या पत्नीला का कॉल करतो, असे म्हणून मारहाण करुन त्याचे अपहरण केले. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांकडे तक्रार न देण्यासाठी वारंवार खंडणी उकळणार्‍या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

वैभव धन्नेकुमार कांबळे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे या गुंडाचे नाव आहे. वैभव कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दरोडा तसेच मारामारीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे, मोठे व्यावसायिक, कंपनी तसेच नागरिकांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने हप्ता वसुली, खंडणी गोळा करणार्‍यांविरुद्ध निर्भीडपणे तक्रार द्यावी, असे आवाहन खंडणी विरोधी पथकाने केले होते. वाल्हेकरवाडी येथील किराणा व्यावसायिक २५ जुलै रोजी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात आले. ते १२ जुलै रोजी दुकानात असताना वैभव कांबळे व त्याचा मित्र अमर हे दुकानात आले. तक्रारदार व वैभव कांबळे याच्या पत्नीचे मोबाईलमधील चॅटींग व वारंवार झालेले कॉल तक्रारदार यांना दाखवले.
किराणा व्यावसायिकाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून लंडन ब्रीजच्या खाली नदीच्या कडेला नेले. तेथून येरवडा येथे घेऊन गेला. तक्रारदार यांच्या मोबाईलमध्ये तक्रारदार व वैभव कांबळे याच्या पत्नीचे फोटो असल्याची खात्री केली . पोलिसात तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. वेळोवेळी ५४ हजार ५०० रुपये घेतले. तसेच नंतर दुकानात येऊन तक्रारदार यांचा आयफोन -१५ घेऊन गेला. किराणा व्यावसायिकाकडे आणखी ५० हजार रुपयांची खंडणी मागत आहे. तेव्हा त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे यांनी त्याचा शोध घेऊन वैभव कांबळे याला वाकड येथील डांगे चौकत पकडले. गुन्ह्यात वापरलेली १० लाख रुपयांची टोयटा ग्लांझा कार, अ‍ॅपल १५ मोबाईल असा १० लाख ७० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. वैभव कांबळे याला पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हवाली केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ़ शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, पोलीस अंमलदार किशोर कांबळे, किरण काटकर, दादाभाऊ साबळे व भरत गाडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here