त्र्यंबकेश्वर मंदिर बनावट ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद; पाच जणांना अटक

त्र्यंबकेश्वर

नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करून भाविकांना जादा किमतीने विक्री करत काळाबाजार करणाऱ्या टोळीला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय. या घटनेनंतर आता मंदिर ट्रस्टकडून देखील ऑनलाइन तिकीट विक्रीत बदल केले जाण्याची तयारी सुरू आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. याचाच फायदा घेत भाविकांना गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलय. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी दररोज साधारणपणे 25 हजार भाविक येतात. त्यापैकी 5 हजार भाविकांना 200 रुपये शुल्क आकारून देणगी दर्शन दिले जाते. त्यापैकी 3 हजार भाविकांना मंदिराच्या उत्तर दरवाजा जवळून देणगी दर्शनाचे पास दिले जातात. तर 2 हजार भाविकांना ऑनलाइनच्या माध्यमातून पास दिले जातात. याच ऑनलाइन पास विक्रीचा मोठा घोटाळा सामोर आला आहे. पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला अटक केली आहे.
ऑनलाइन पास बनवताना ही टोळी बनावट नावे, आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबरच्या माध्यमातून रोज 200 ते 300 पास काढून घेण्याचं काम करत होती. मंदिर परिसरात गरजू भाविकांना 200 रुपयांचा पास 500 ते 1000 रुपयांना विक्री करत होती. या पाच जणांचा ‘डायरेक्ट खटलं’ नावाचा व्हॉटअप ग्रुप होता. त्यात एकमेकांना टोपन नावे देऊन रोज किती तिकीट काढली, कोणी किती तिकीट विकली याची माहिती एकमेकांना दिली जात होती. त्यांनी आतापर्यंत 1648 बनावट देणगी पास काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्र्यंबकेश्वर परिसरातून दिलीप नाना झोले (पेगलवाडी, त्र्यंबक), सुदाम राजू बदादे (पेगलवाडी, नाशिक), समाधान झुंबर बोथे (रोकडवाडी, त्र्यंबक), शिवराज दिनकर आहेर (निरंजनी आखाडा, त्र्यंबक), आणि मनोहर मोहन शेवरे (रोकडवाडी, त्र्यंबक) त्यांच्या मोबाइल आणि ईमेल हिस्ट्रीच्या तपासात बनावट पासचा काळाबाजार उघड झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here