बारामती (प्रतिनिधी) : हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पित्यासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात रविवारी (दि २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३२, रा. सणसर, ता. इंदापूर) , सई ओंकार आचार्य (वय १०), मधुरा ओंकार आचार्य (वय ४) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
बारामती शहरातील खंडोबानगर चौकात हा अपघात झाला आहे. ओंकार आचार्य हे स्प्लेंडर या दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन निघाले होते. त्यावेळी हायवा ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी मागच्या चाकाखाली आल्याने ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन मुलींना स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात नेत असतानाच त्या दोन मुलींचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर, अनेकांचे डोळे पाणावले. अधिक तपास बारामती पोलीस करत आहेत.







