बळीराजाला शेती, जल व जंगल व जमिनीपासून दूर करण्याचे षडयंत्र – कॉ.ॲड.अजय बुरांडे

शेती

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पर्यावरण संवर्धन करण्यापेक्षा विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास करत निसर्गाच्या सानिध्यात वावरणाऱ्या, पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनाचे बाळकडू घेतलेल्या बळीराजाला स्वतःच्या शेती, जल,जंगल आणि जमिनीपासून हुसकावून लावण्याचे षडयंत्र सत्ताधारी जन सुरक्षा विधेयकाडून करत असून या विधेयकाला शेतकऱ्यांचा देखील तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. शेती, कर्जमाफी आणि पर्यावरण संवर्धन करिता तालुक्यातील नागापूर येथे सोमवार दि 28 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व बीड जिल्हा किसान सभेकडून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.

राज्याला संत परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभलेली असून पुरोगामी विचारधारेचे संत तुकाराम महाराज यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगातून राज्यातील शेतकऱ्यांची निसर्गाप्रति, शेती आणि जंगलप्रति असलेली वास्तविक आस्था कथन केली. स्वतःच्या कष्टातुन, रक्ताचे पाणी करून बळीराजा स्वताचा उदरनिर्वाह करत पर्यावरण संवर्धन आणि जतन करण्याचे काम पूर्वापार करत आलेला असताना भांडवली, उद्योगपतीधार्जिनी व हुकूमशाही प्रवृत्ती असलेले सत्ताधारी जन सुरक्षा विधेयकाडुन सूरजगड सारख्या ठिकाणी जंगल उद्धवस्त करत जगाचा पोशिंदा असलेल्या आदिवासी व बळीराजा याना शेती,जल, जंगल आणि जमिनीपासून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. शेती आणि शेतकरी उध्वस्त करण्याचा कुटील डाव देशातील आणि राज्यातील सत्ताधारी करू पाहत असून विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास करत या कृत्या विरोधात आवाज करणाऱ्या निसर्ग व पर्यावरणप्रेमी यांचा आवाज दाबण्याचे आणि संविधान विरोधी जन सुरक्षा विधेयकाला आता जनसामान्यांचा रोष आणि संताप उघड उघड दिसून येत आहे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष्यांचे जिल्हा सचिव कॉ.एड.अजय बुरांडे यांनी केले.
परळी तालुक्यातील नागापूर येथे निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण व जन सुरक्षा विधेयक विरोधी निदर्शने संपन्न झाली या प्रसंगी माकपचे जिल्हा सचिव कॉ.एड.अजय बुरांडे, किसान सभेचे कॉ. मुरलीधर नागरगोजे, हनुमंत सोळंके,भगवान सोळंके,दत्ता गव्हाणे, ज्ञानेश्वर सोनटक्के,गणेश सोळंके, सिद्राम सोळंके आदींसह असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here