पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांकडून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेले दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या भोसरी परिसरात केली आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आढावा बैठकीमध्ये गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून अवैध अग्नीशस्त्र वापरणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम असे पथक एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असतांना, चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज राजू गिराम उर्फ डोंगरे (वय २०, रा.मेनकरवाडी, मार्तंडनगर, चाकण) हा आरटीओ रोड, मोशी प्राधिकरण पुणे येथे गावठी पिस्टल विक्री करणेकरिता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १ लाख २ हजार रुपये किंमतीचे २ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली. त्याचेविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करीत आहे. मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सन २०२५ मध्ये ७ महिन्यात १६ देशी बनावटीचे पिस्टल व ४२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे.
ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह.पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पांडूरंग देवकाते, पोलीस अंमलदार गणेश सावंत, हर्षद कदम, सुमित देवकर, विनोद वीर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे यांनी केली आहे.







