साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी व्हावी – सुरेश पाटोळे यांची मागणी

अण्णाभाऊ साठे

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : साहित्यसम्राट, लोकशाहीर आणि श्रमिकांच्या आवाजाचे धारदार अस्त्र ठरलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ही जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करणे बंधनकारक असूनही अनेक कार्यालयांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी व्यक्त केली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सामान्य,वंचित, कष्टकरी वर्गाच्या जीवनाच्या संघर्षाचे प्रतिनिधी होते. त्यांनी अत्यंत साध्या, सरळ भाषेत समाजमनाला स्पर्श करणारे साहित्य निर्माण केले. कादंबरी, पोवाडा, लावणी, लोकनाट्य आणि गीतांद्वारे त्यांनी सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यांच्या रचनांतून दलित, श्रमिक, भटक्या विमुक्त समाजाला आत्मभान लाभले. त्यांच्या ‘फकीरा’ या कालजयी कादंबरीला महाराष्ट्रशासनाचा पुरस्कार लाभला होता. आज अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्यावर संशोधन होऊन शेकडो विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. इतकेच नव्हे, तर अण्णाभाऊ साठे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापल्याड रशियात गाणारे ते पहिले कलावंत ठरले. हे ऐतिहासिक योगदान सुद्धा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सुरेश पाटोळे पुढे म्हणाले की, “राज्य शासनाने परिपत्रक काढून ही जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्याचे निर्देश दिलेले असताना, काही कार्यालयांत मात्र या जयंतीकडे दुर्लक्ष केले जाते. अशा महामानवांचा अपमान होऊ नये, म्हणून प्रत्येक कार्यालयाने शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आदरपूर्वक साजरी करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. ‘ जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्याचा जागर करून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here