आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीस ठाणे शहर पोलिसांनी केले जेरबंद

ठाणे शहर पोलिसांनी

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : ठाणे शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई करत आंतरराज्यीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याजवळून ३ किलो ३९० ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, ठाणे शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगी त्यांनी सापळा रचत दि. ३१ जुलै रोजी कारवाई केली. उथळसर नाका येथील सुप्रब सोसायटीजवळील रसोई पोळी भाजी केंद्र येथे आरोपी मोहमद मकसुद मोहमद अहमद (वय ४२, रा. दुनियागंज, आंशिक, फुलपूर, जि.अलाहाबाद) हा त्याच्याजवळीत चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील ३ किलो ३९० ग्रॅम वजनाचा चरस अंदाजे किंमत ३ कोटी ३९ लाख रुपये जप्त करण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या अंगझडतीतील त्याचे वापरातील कपडे, एक पाकीट, प्लॅस्टिकची मोठी पिशवी मिळाली. तसेच रोख १७७० रुपये, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, नोटीस असा एकूण ३ कोटी ३९ लाख ७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत राबोडी पोलिस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला दि. ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे हे करीत आहेत.
आरोपी हा प्रयागराद, उत्तरप्रदेश येथील राहिवासी असून, चरस त्याने ठाणे येथे विक्री करण्यासाठी आणला होता. कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण सहभागी आहे याचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here