
नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : हे जग स्पर्धेचे आहे.सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. ती मैत्रीत देखील आली आहे. म्हणून या कठीण काळात च मैत्री जपता आली पाहिजे.अनेक क्षेत्रात मैत्रीत स्पर्धा येते अशावेळी स्पर्धेत मैत्री जपता आली पाहिजे. उत्तम मित्रांचा संग्रह करण्यासाठी आपले चित्त शुद्ध हवे तर मैत्री टिकते,मैत्री व्यापक होते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक संदीप जगताप यांनी व्यक्त केले.
नाशिक येथील सरस्वती नगर पंचवटी परिसरात ज्ञानवर्षा फाउंडेशनच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून ‘ मैत्र जीवाचे’ या विशेष व्याख्यान पर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार विजय कच्छवे, पंडितराव ढिकले, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्राचार्य डॉ. दीपक कारे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय गव्हाणे, कवी संजय आहेर, पंढरीनाथ अनारसे, प्रा डॉ कल्पना अहिरे आत्माराम वाघमारे, प्रा डी जी गायकवाड, आदी उपस्थित होते.
संदीप जगताप पुढे म्हणाले की खरी मैत्री जात, धर्म,व्यवसाय बघत नाही. खऱ्या मैत्रीला अशा सीमा कृत्रिम सीमा नसतात. समाजाचा विकास करायचा असेल तर सर्व स्तरावरील शत्रुत्वभाव नष्ट होऊन मैत्र भाव जोपासला पाहिजे. परस्परांविषयी द्वेष मत्सर, हे मैत्रीच्या आड येणारे घटक आहेत. वस्तू, भौतिक संपत्ती,सौंदर्य, पद,याचा अहंकार मैत्रीच्या आड येता कामा नये. मैत्री करताना निर्मळ भावनेने,शुद्धचिताने मैत्री केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नायब तहसीलदार विजय कच्छवे म्हणाले की खऱ्या मैत्रीचे संस्कार हे बालपणापासून होत असतात. चांगले मित्र हे संपत्ती सारखे असतात. ते सुखदुःखामध्ये आपल्या कामाला येतात. म्हणून प्रत्येकाने चांगल्या मित्रांचा संग्रह करावा. कवी संजय आहेर यांनी मैत्री वरील अनेक सुंदर रचना सादर करून मैत्रीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव ढिकले म्हणाले की, ज्ञानवर्षा फाउंडेशनने परिसरात साहित्यिक उपक्रम राबवून शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवली आहे. असे उपक्रम समाजाला पुढे घेऊन जाणारे असतात.असे गौरव उद्गार काढून भविष्यात वेगवेगळ्या विषयांवर चांगले वक्ते बोलवून समाजाचे प्रबोधन करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे यांनी ज्ञानवर्षा फाउंडेशनचा भविष्यात साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, बालसंस्कार , आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविणार आहे असा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ संपदा ढगे हिने करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनिषा कोटकर यांनी केले तर आभार प्रा संदीप पुरकर यांनी मानले. कार्यक्रमास पंचवटी नगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






