पालघर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रामदास पाटील) : DCBO पालघर व सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO) यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड, पालघर (पूर्व) येथे आरोग्य तपासणी व स्प्री (Scheme to Promote Registration of Employers and Employees) जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विमाधारक कामगारांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे तसेच ESIC योजनेतील नोंदणी व लाभांविषयी माहिती देणे असा होता. शिबिरादरम्यान १७० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब मोजणी आणि प्राथमिक वैद्यकीय सल्ला यांचा समावेश होता. गरजू कामगारांना आवश्यक औषधांचे वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. प्रमोद भोये (IMO), अजय मोर (नर्सिंग अधिकारी), प्रीती पुरी (फार्मासिस्ट), नितीन रामटेके (SSO) व नितीन नेवाळकर (शाखा व्यवस्थापक, DCBO पालघर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फ्रेडुन मंडोरा यांच्या वतीने कॉर्पोरेट अफेअर्स हेड लक्ष्मण पवार, COO अभिजीत सिंग, HR विभागाचे स्वप्निल राऊळ आणि HR अभिजीत पवार, रामदास पाटील हे उपस्थित होते. कंपनीच्या वतीने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले व भविष्यातही असे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली.







