पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी चिमुकल्या श्रेयसची धडपड

सहा वर्षापासून राबवतोय उपक्रम; मित्रांना मूर्तीकला शिकविण्यासोबत बाहेरगावी नातेवाईकांपर्यंत पोहचवतोय संकल्पना

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शासनामार्फत विविध पातळीवर उपाययोजना -केल्या जात आहेत. वारंवार आवाहनदेखील करण्यात येत आहे. यालाच अनुसरुन जनमानसात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी, यासाठी शहरातील चिमुकला श्रेयस योगेश शुक्ल या विद्यार्थ्याची धडपड सुरु आहे. गेल्या सहा वर्षांपासून श्रेयस स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवून नातेवाईक व मित्रांपर्यंत पोहचवित आहे.
ही संकल्पना अधिकाधिक रुजावी यासाठी तो गल्लीतील व शाळेतील मित्रांनाही गणेशमूर्ती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबत ते बनविण्याचे धडे देत आहे. त्याच्याकडून मूर्तीकला शिकलेले अनेक बालके आता घराघरातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवून शासनाच्या या उपक्रमास हातभार लावत आहेत.
शहरातील नागेश्वर कॉलनीतील राहिवासी रंगकर्मी योगेश शुक्ल व मूळजी जेठा महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठमहाविद्यालयाल प्राध्यापिका श्रध्दा पाटील शुक्ल यांचा श्रेयस हा चिरंजीव आहे. तो सध्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. शाळेत झालेल्या शाडू मातीच्या मूर्तीचे पर्यावरणाच्यादृष्टीने किती महत्त्व आहे, हे त्याला जाणवले. दुसरीत असताना त्याने पहिल्यांदा शाडू मातीची मूर्ती घडवून घरच्याघरी गणेशोत्सव साजरा केला होता.
चिमुकल्या श्रेयसच्या या धडपडीचे परिसरातील नागरिकांसह, नातेवाईक व शिक्षकांकडून कौतुक करण्यात येत असून, गेल्या सहा वर्षापासून त्याने जवळपास ३६ – ४० गणेशमूर्ती केल्या आहेत. त्याने केलेल्या ह्या गणेशमूर्त्या शहरातील नातेवाईकांसह बाहेरगावी असलेली मावशी, मामा, आजी या नातेवाईकांपर्यंत आईवडीलांच्या मदतीने तो पोहचवत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here