धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) : पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.
धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी नुकतीच पाहणी केली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या अनुदानाच्या बदल्यात रोहिणी नांद्रे यांनी स्वतःसाठी आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून रोहिणी नांद्रे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याच्या दिशेने पावले पडत असली, तरी शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रातील अशा घटना चिंताजनक आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे







