राजगड (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील सुठालिया पीएम श्री या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी भरवर्गात पॉर्न व्हिडिओ लावला. वर्गातील काही विद्यार्थी तो व्हिडिओ पाहत बसले असता, दुसऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मोठी खळबळ उडाली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलं. या व्हिडिओ प्रकरणी जिल्हाधिकारी करण सिंह भिलाला यांनी माहिती दिलीय. ज्या शाळेचा हा व्हिडिओ आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडिओ जुना असून व्हिडिओ समोर आल्यानंतर तीन मुख्याध्यापकांचं एक चौकशी पथक तयार करण्यात आलंय. ते या प्रकरणाची चौकशी करतील. येत्या ३ दिवसांत ते जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करतील.
या व्हिडीओत शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी बसवलेल्या एलईडी टीव्ही स्क्रीनवर एक पॉर्न व्हिडिओ सुरू असून, स्क्रीनजवळ एक विद्यार्थी उभा आहे. १३ विद्यार्थी खुर्च्यांवर बसले आहेत. टेबलाजवळ बसलेले काही विद्यार्थी त्यांच्या मोबाईलने स्क्रीनवर चालू असलेल्या चित्रपटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. दरम्यान काही विद्यार्थी हसताना आपले चेहरे लपवताना दिसत आहेत.







