दारु पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने केला आईच्या खूनाचा प्रयत्न

चाकूहल्ला

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) – दारु पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने झोपेत असलेल्या आईच्या छातीत चाकूने वार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील सिंहगड रोड भागात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी बाबासाहेब कांबळे हे रिक्षाचालक असून सावित्रीबाई फुले वसाहतीत ते, आई,भाऊ आणि पत्नीसह राहतात. त्यांचा लहान भाऊ कृष्णा हा आईसोबत दारुला पैसे देण्याच्या कारणावरुन सतत वाद घालत असतो. त्याला समजावून सांगण्यासाठी त्यांचे मामा धोंडीराम सरवदे हे घरी आले होते. रात्री साडेनऊ वाजता कृष्णाने आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. तिने नकार दिला. त्यामुळे कृष्णा रागात तुला संपवतोच असे म्हणून घरातून निघून जात असताना मामाने त्याला घरात घेतले. दरवाजा आतून बंद केला.
फिर्यादी व मामाने त्याला खूप समजावले. बेडवर झोपायला सांगितले. तो बेडवर जाऊन झोपला. बाकी खाली झोपले. थोड्या वेळाने कृष्णा खाली येऊन आई शेजारी झोपला. पहाटे साडेचार वाजता आईच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी उठवून पाहिले तेव्हा कृष्णाच्या हातात चाकू होता. आईला काय झाले हे पाहिले असता कृष्णाने आईच्या छातीमध्ये चाकूने वार केला होता. त्यांनी आईला तातडीने रुग्णालयात नेले. पोलिसांनी कृष्णा कांबळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here