औंधमधील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा तिघा चोरट्यांचा प्रयत्न फसला

crime
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : स्वातंत्र्य दिनामुळे रस्त्यावर रहदारी कमी असल्याचा फायदा घेऊन औंंधमधील ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न तिघा चोरट्यांनी केला. सराफाने त्यांना प्रखर विरोध केल्याने त्यांचा प्रयत्न फसला. तीनही चोरटे पळून गेले. ही घटना औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्समधील रादेव ज्वेलर्स येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नेमाराम चौधरी (वय ५८) यांचे रामदेव ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ते एकटेच दुकानात होते. त्यावेळी तिघे जण दुकानात शिरले. त्यांच्याकडे कोयते, तलवारी होत्या. त्यांनी दुकानात शिरुन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चौधरी यांनी त्यांना प्रतिकार केला. तेव्हा त्यांनी चौधरी यांना ओढत दुकानातून बाहेर आणले. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून आजू बाजूचे लोक जमा होऊ लागल्याचे दिसताच चोरटे पळून जाऊ लागले. तेव्हा नेमाराम चौधरी यांनी त्यांचा पाठलाग केला. ते पळून जात असताना चौधरी यांनी त्यांची दुचाकी लाथ मारुन पाडली. त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून विधाते वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याने पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here