पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : बाबा शेख गँगचा टोळी प्रमुख बाबा शेख व त्याचा नंबरकारी साथीदार यांना तडीपार केले असताना ते हद्दीत फिरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने त्यांना औंध हॉस्पिटल परिसरात जेरबंद केले. त्यांच्याकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिसांनी जेरबंद केलेल्यांमध्ये बाबा सैपन शेख (वय २७, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी) आणि त्याचा साथीदार आशिष अनिल कांबळे (वय २५, रा. काशीदनगर, पिंपळे गुरव, सांगवी) यांचा समावेश आहे.बाबा शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून तो करोना काळात येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला. त्यानंतर तो परत कारागृहात हजर झालेला नाही. त्याबाबत येरवडा कारागृहातून पोलिसांना कळविण्यात आले आहे. बाबा शेख याच्या विरुद्ध १५ गुन्हे दाखल असून आशिष कांबळे याच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक १४ ऑगस्ट रोजी गुन्हे नियंत्रणाच्या दृष्टीने गस्त घालत असताना पोलीस हवालदार मोहम्मद गौस नदाफ, पोलीस अंमलदार धनंजय जाधव, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बाबा शेख व त्याचा साथीदार आशिष कांबळे हा औंध हॉस्पिटल परिसरात येणार असून त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, पोलीस हवालदार प्रविण दळे, मोहम्मद गौस नदाफ, कुणाल शिंदे, सुरेश जायभाये, पोलीस अंमलदार प्रशांत सैद, धनंजय जाधव, अमर राणे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, रवी पवार, नितीन ढोरजे यांनी केली आहे.







