गुन्हेगारी विरोधी कारवाईत मदत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ.बिनू वर्गीस यांचा पोलिसांतर्फे सन्मान

गुन्हेगारी विरोधी कारवाई

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : वसई-विरार परिसरातील गुन्हेगारी विरोधी कारवाईत एका समाजसेवकाच्या धाडसपूर्ण आणि संवेदनशील कार्याची दखल घेऊन एमबीव्हीव्हीचे पोलिस आयुक्त सीपी निकेत कौशिक यांनी त्यांना सन्मान चिन्ह व कौतुकपत्र देऊन गौरवले.ही घटना नुकत्याच पार पडलेल्या एमबीव्हीव्हीच्या पहिल्या गुन्हे परिषदेच्या बैठकीत घडली.

सामाजिक कार्यकर्ते डॉ.बिनू वर्गीस यांनी दिलेल्या वेळेवरच्या माहितीद्वारे १२ वर्षांच्या अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. ही मुलगी जबरदस्तीने वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आली होती. डॉ.बिनु वर्गीस यांच्या सूचनेनंतर एमबीव्हीव्ही गुन्हे शाखा व नायगाव पोलिसांनी तातडीची धडक कारवाई करून या प्रकरणाशी संबंधित ९ बांगलादेशी आरोपींना अटक केली.
या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आयफोन १५ प्रो मोबाईलच्या डेटावरील तपासातून उघड झाले की त्या अल्पवयीन मुलीवर तब्बल २२३ ग्राहकांनी बलात्कार केला होता. या अमानुष वास्तवाने समाजातील काळी बाजू पुन्हा एकदा उघड केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
पोलिस आयुक्त कौशिक यांनी या प्रकरणात समाजसेवकाची भूमिका अधोरेखित करताना सांगितले की, “देशाला अशा संवेदनशील व धाडसी समाजसेवकांची आज अत्यंत गरज आहे.” डॉ. बिनू वर्गीस यांचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून समाजातील प्रत्येक सजग नागरिकासाठी प्रेरणादायी संदेश आहे. ही घटना सिद्ध करते की, सामाजिक जबाबदारी आणि पोलिस प्रशासन यांचा योग्य समन्वय झाल्यास कोणतेही रॅकेट मोडून काढणे शक्य आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here