सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला जवळपास २०० मीटर फरफटत नेल्याचा प्रकार परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सातारा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास खंडोबाचा माळ परिसरात एका रिक्षाचालकाने भरधाव वेगात गाडी चालवत २-३ वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर देखील तो थांबला नाही. या घट्नेची माहिती वाहतूक शाखेत तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री जाधव यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि रिक्षा थांबवण्यासाठी चौकात त्या उभ्या राहिल्या.
मात्र रिक्षा चालक थांबला नाही. महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडलं. मात्र त्यामुळे त्या महिला कॉन्स्टेबल पोलिसाच्या रेनकोट रिक्षाचा मागील अँगल मध्ये अडकला आणि त्या रस्त्यावर ओढल्या गेल्या. किमान २०० मीटर हुन अधिक फरफटत गेल्या. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले लोक ओरडू लागले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाने धाडस दाखवले. त्याने धावत जाऊन रिक्षाचे हँडल धरले आणि पूर्ण ताकदीने ते थांबवले, तेव्हाच महिला पोलिस अधिकाऱ्याची सुटका झाली. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नर पर्यंत असणाऱ्या दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.







