कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर जावेद देवडी) । राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान सातापा गोविंद मिसाळ (वय ३४) यांचा पंजाबमध्ये कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरकारी निवासस्थानी वॉशिंग मशीन दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मिसाळवाडीसह संपूर्ण राधानगरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवान सातापा मिसाळ हे पंजाबमधील सरकारी निवासस्थानी आपल्या पत्नीसोबत राहत होते. वॉशिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने ते स्वतः ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीलाही विजेचा धक्का बसला आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातापा मिसाळ यांच्या निधनाची बातमी गावात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या मातीतल्या सुपुत्राचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थ शोकाकुल झाले आहेत.
जवान सातापा मिसाळ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मिसाळवाडी येथे आणले जाणार असून, लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि मुले असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.







