धुळे (उपसंपादक प्रशांत सुर्यवंशी) । गणेशोत्सव हा देशभरात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. यावर्षीही सर्व गणेशमंडळांनी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृह येथे संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे, विश्वजीत जाधव यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, विविध विभागांचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते म्हणाल्या की, गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात. यावर्षीं देखील गणेशोत्सव साजरा करतांना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी देखावे, आरास करतांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवर आधारित आरास करावी. गणेशोत्सवाबाबत गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अडचणी, सूचनांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तसेच गणेशमंडळांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. देवरे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात व शहरात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हाच पायंडा यावर्षीही पाळण्यात यावा. गणेशोत्सव साजरा करतांना कुणाच्याही भावना दुखावणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करु नयेत. मंडळाच्या पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत. मोठ्या मंडळांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटिव्ही लावावेत. विसर्जनाच्या ठिकाणी स्वंयसेवकांची नेमणूक करावी. महिला, भगिनींची अधिक काळजी घ्यावी. गणेशोत्सवात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी एसआरपीएफच्या व होमगार्डच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडून वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. वर्गणीसाठी कुणावरही जबरदस्ती करु नये, स्टेजचे उभारतांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन महापालिका आणि पोलीस प्रशासनाची आवश्यक परवानगी घ्यावी. जाहिरात फलक लावतांना परवानगी घ्यावी. जाहिरात फलकावरील मजकुर जातीय, धार्मिक द्वेष निर्माण करणारे नसावेत. दर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतत्र व्यवस्था करावी. दर्शनावेळी जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांना ध्वनीप्रदुषणाचा त्रास होवू नये यासाठी डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. लेजर शोचा वापर टाळावा. विसर्जनावेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. मिरवणूकीत ज्या ट्रॉलीवर किंवा गाडीवर जाणार आहे त्याची आरटीओकडून परवानगी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी महापालिकेमार्फत आगामी गणेशोत्सवानिमित्त रस्त्यांची डागडुगी, मोकाट जनावरे तसेच आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने सांगितले. तर विद्युत विभागामार्फत गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, तक्रार निवारण कक्षची स्थापना, तसेच गणेशमंडळांना घरगुती दराप्रमाणे विद्युत पुरवठा तसेच सुरक्षा ठेवची रक्कम कमी करणे, लोंबकळणा-या विद्युत तारा काढण्यात येईल असे महावितरणचे अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी विविध गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच काही मौलिक सुचना मांडल्या. बैठकीस विविध गणेशमंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.







