शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई: कंटेनरमधून जाणारा ४४ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

शिरपूर

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) | केंद्रशासित प्रदेश चंदिगड येथून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा विदेशी दारूचा मोठा साठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत एका कंटेनरसह एकूण ४४ लाख ६३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, हरियाणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

दिनांक ७ मे २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना एक गोपनीय माहिती मिळाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरून मध्य प्रदेशातील सेंधवा बाजूकडून धुळ्याकडे एका कंटेनरमधून (क्रमांक RJ 32 GB 4036) अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे समजले.

या माहितीच्या आधारे शोधपथकाने हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचला. रात्री ११:४५ च्या सुमारास संशयित वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पंचांच्या उपस्थितीत कंटेनरची झडती घेतली असता, त्यात ‘ऑल सीजन्स’, ‘अंकल टॉम’ आणि ‘रॉयल चॅलेंज’ कंपन्यांच्या विदेशी दारूचे एकूण ३६६ खोके मिळून आले. या सर्व बाटल्यांवर ‘ओनली सेल फॉर चंदिगड’ असे लेबल होते, ज्यावरून हा साठा महाराष्ट्राचा महसूल बुडवून अवैध विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या मालात विदेशी दारू (विविध कंपन्या): १९,६३,८०० रुपये, टाटा कंटेनर: २५,००,००० रुपये असा एकूण ४४,६३,८०० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सतिषकुमार पुडाराम जाट (वय ४४, रा. हरियाणा) याला ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत.

ही यशस्वी कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here