दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; १६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

घरफोडी

अहिल्यानगर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) | सांगवी (ता. श्रीगोंदा) येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ लाख ५९ हजार २६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

२९ एप्रिल २०२६ रोजी सांगवी येथील फिर्यादी सतिश उत्तमराव भोईटे यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा नितीन दत्तात्रय जाधव (वय ४० वर्षे, रा. गेवराई, जि. बीड) याने केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याला अहिल्यानगरमधील दौंड रोड परिसरातील हनुमान नगर येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याजवळून ८,२३,२६० रुपये किमतीचे ७७ ग्रॅम ६२ मिली वजनाचे दागिने आरोपीच्या घरातून हस्तगत केले. , ८,३६,००० रुपये किमतीचे ७० ग्रॅम ३९० मिली दागिने, जे आरोपीने सराफाला विकले होते. ४०,००० रुपये किमतीचे दोन लॅपटॉप असा १४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व २ लॅपटॉप असा एकूण १६,५९,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेला नितीन जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, यवत, तसेच सोलापूरमधील पंढरपूर आणि बीडमधील गेवराई पोलीस ठाण्यात यापूर्वीच ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक संदीप मुदकुटे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here