पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध शहरांतून चोरी केलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या एकूण २४ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महाळुंगे येथील पानसे ऑटो प्रा. लि. कंपनीच्या पार्किंगमधून संदीपकुमार निसाद यांची स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी महाळुंगे ते जुन्नर असा सुमारे ८० किलोमीटरचा सीसीटीव्ही मागोवा घेतला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना निष्पन्न केले. त्यानंतर सापळा रचून यश सुनील हांडे (वय १९, रा. पिंपळगाव सौदा, जुन्नर) आणि किरण संभाजी जाधव (वय २६, रा. टिकेकरवाडी, जुन्नर) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे केलेल्या सखोल तपासात त्यांनी पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून रॉयल एनफिल्ड (बुलेट): १३ गाड्या, यामाहा (R15): ३ गाड्या, होंडा (शाईन, युनिकॉर्न, ॲक्टिव्हा): ३ गाड्या, पल्सर, सुझुकी, स्प्लेंडर : ५ दुचाकी जप्त केल्या आहेत
ही धडाकेबाज कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उप-आयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि तपास पथकातील अंमलदारांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार चेतन सावंत करत आहेत.







