खुंटी (झारखंड) (वृत्तसंस्था) । जिल्ह्यात ५ वर्षांच्या मुलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिठाईचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या मुलीला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील जरियागढ गावात बुधवारी ५ वर्षीय चिमुकलीअंगणवाडीत गेली होती. अंगणवाडीतल्या जेवणाच्या सुट्टीत जेवून ती बाहेर गेली असता १५ वर्षीय आरोपीने मिठाई देण्याच्या बहाण्याने तिला हाक मारली. तिला मिठाई दिल्यानंतर अजून मिठाई देतो सांगून आरोपीने तिला ३०० मीटर लांब असलेल्या एका झुडपात नेले. त्या झुडपात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. यानंतर १५ वर्षीय अल्पवयीन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
अंगणवाडी सुटल्यानंतर पीडित चिमुकली घरी आली. तिची आई आजारी असल्याने तिने वडील शेतातून आल्यानंतर सगळी हकीकत वडिलांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीच्या वडिलांनी जरियागढ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.







