बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेतर्फे संस्कृत बालनाट्य स्पर्धेची १५ व १६ सप्टेंबरला अंतिम फेरी

बालरंगभूमी परिषद

नागपूर (प्रतिनिधी) । बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक (विस्तार सेवा मंडल) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत बालनाट्य स्पर्धेचे मागील तीन वर्षांपासून आयोजन करीत आहे. ही स्पर्धा प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अशी दोन स्तरावर विविध केंद्रावर आयोजीत करण्यात येत असते, या वर्षी देखील ही स्पर्धा बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेद्वारे प्राथमिक व अंतिम फेरी या दोन स्तरावर आयोजीत करण्यात आली होती.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.१८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, मौदा व नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती. प्राथमिक फेरीच्या ५२ शाळांमधून उत्कृष्ट १८ संघाची परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. प्राथमिक फेरीचे परीक्षण डॉ.स्मिता होटे, सौ.अपर्णा लखमापूरे, श्री.मुकुंद वसूले व सौ. कल्याणी गोखले यांनी केले.
संस्कृत बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि.१५ व १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या नियोजित संस्कृत बाल नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजयी चमूस प्रथम, व्दितीय व तृतीय रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार असून, बालक व बालिका यांना उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक व अभिनयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. याशिवाय दिग्दर्शन, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा व वेशभूषा यासाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व तांत्रिक सहकार्य करणाऱ्यांनाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून बाल कलाकारांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here