पुरी (ओडिशा) (वृत्तसंस्था) । जिल्ह्यात ब्रह्मगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बलिहारीचंडी समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एकाची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शनिवारी दुपारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती.त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी या जोडप्याचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. आरोपींनी पीडितेच्या बॉयफ्रेंडला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
त्यांनतर आरोपी फरार झाले. ही घटना शनिवारी घडली, परंतु बदनामीच्या भीतीने ती तक्रार देण्यास घाबरत होती. पोलिसांनी समजूत काढली आणि तिने घडलेला प्रकार सांगितला. आरोपींचे वर्णन देखील तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतण्यास सुरुवात केली.
पुरीचे पोलीस अधीक्षक प्रतीक सिंग यांनी सांगितले की, सोमवारी ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 70 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपींकडून त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी पोलिसांच्या भीतीने व्हिडीओ डिलीट केले होते. तरीही पुढील तपासासाठी आणि डेटा रिकव्हरीसाठी हे मोबाईल भुवनेश्वरमधील राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.







