जालना (प्रतिनिधी) । राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची कार पेटवून देण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील नीलमनगर भागात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती हे कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद पेटले आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे दोन्ही समाजातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचले असताना नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार फोडल्याची घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नवनाथ वाघमारे यांची कार सोमवारी रात्री जालना शहरातील नीलम नगर भागात उभी होती. तेव्हा रात्री 11 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिली.
सुदैवाने गाडीत कुणीही नव्हते. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आरडाओरड केली. तसेच गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक अज्ञात व्यक्ती कार पेटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी याविरोधात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. अज्ञात व्यक्तीने गाडी जाळण्याचा प्रयत्न का केला? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.







